निलंबित कर्मचाऱ्याकडे केली लाचेची मागणी…
पुणे, दि. ११: निलंबित कर्मचाऱ्याकडून तीन लाख रुपयांची लाच मागणारे कृषी आयुक्तालयातील फलोत्पादन विभागातील उपसंचालक संजय गुंजाळ यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. संगमवाडी परिसरात शुक्रवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. तडजोडीअंती गुंजाळ यांनी अडीच लाख रुपये घेण्याचे मान्य करून, रक्कम स्वीकारताना त्यांना ताब्यात घेण्यात आले.
गुंजाळ यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये येरवडा पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. कृषी आयुक्तालयातील निलंबित कर्मचाऱ्याने तक्रार दिली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार २०१९-२०२०मध्ये जळगाव,बुलढाणा येथे कनिष्ठ लिपिक होते. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत गैरव्यवहार; तसेच कसुरी केल्याचा ठपका ठेवून अमरावतीतील कृषी सहसंचालकांनी त्यांना सेवेतून निलंबित केले होते. या प्रकरणाची चौकशी सुरू होती. निलंबन कालावधीत मदत करणे आणि चौकशीत मदत करण्यासाठी गुंजाळ यांनी त्यांच्याकडे तीन लाख रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने तडजोडीत अडीच लाख रुपयांची लाच देण्याचे मान्य करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे कार्यालयात तक्रार दिली.
या तक्रारीची पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी पडताळणी केली. शुक्रवारी रात्री तक्रारदाराला अडीच लाख रुपये घेऊन संगमवाडी येथील खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या आराम बस थांब्यावर बोलविण्यात आले. तक्रारदाराकडून लाच घेताना गुंजाळ यांना पकडण्यात आले. शुक्रवार दिनांक १० जानेवारी रोजी रात्री उशिरा त्यांच्याविरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक प्रवीण निंबाळकर तपास करीत आहेत.